PEN : बेलवडे परिसरातील ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रमक; सिडकोला पाच दिवसांचा अल्टिमेटम

बेलवडे परिसरातील ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रमक
PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
पेण तालुक्यातील बेलवडे व परिसरातील गावांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, CIDCO च्या जलबोगदा प्रकल्पामुळे भूगर्भातील पाणीस्तर कोसळल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विहिरी, बोअरवेल आणि नैसर्गिक जलस्रोत आटल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला असून गावकरी अक्षरशः त्रस्त झाले आहेत.
सोमवारी झालेल्या बैठकीत आमदार रविशेठपाटील , माजी खासदार धैर्यशील पाटील आणि प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत संतप्त ग्रामस्थांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. हेटवणे जलबोगद्याच्या कामामुळे तीन गावे व तेरा आदिवासी वाड्यांतील पाणीस्त्रोत ३०० फूट खाली गेल्याचा आरोप करत, धामणी मार्गे पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची तसेच दूषित पाणी खाडीत सोडण्याची मागणी करण्यात आली. या मागण्या पाच दिवसांत पूर्ण न झाल्यास जलबोगद्याचे काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला.
बैठकीत सरपंच हरेष पाटील, सामाजिक कार्यकर्ते हरेष बेकावडे, पंचायत समिती उपसभापती संजय डंगर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. “करो या मरो”च्या भूमिकेत ग्रामस्थांनी एकजुटीने आंदोलनाचा इशारा दिला असून, येत्या पाच दिवसांत सिडको प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.