Murud : अल्पवयीन मुलीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शारीरिक अत्याचार

Rape
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून त्याचे दुष्परिणामही समोर येत आहेत. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात अल्पवयीन मुलगी राखी (नाव बदललेले) हिने सोशल मीडियावर झालेल्या ओळखीमुळे झालेल्या छळाविरोधात मुरुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी राजेश (नाव बदललेले) हा देखील अल्पवयीन असून त्याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून पीडितेशी ओळख वाढवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
प्राप्त महितीनुसार दिनांक १० मे २०२५ ते २८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आरोपी राजेशने पीडितेशी इंस्टाग्रामवरून ओळख करून घेतली. त्यानंतर त्याने तिला घरी बोलावून विवाह करण्याचे आश्वासन दिले. मात्र नकार दिल्यानंतरही पीडितेवर दबाव टाकत त्याने वारंवार संबंध ठेवले. या प्रकाराची माहिती असूनही आरोपीचे आई-वडील दिनकर आणि माया (नावे बदललेली) यांनी मुलाला प्रोत्साहन दिले. सततच्या जाचाला कंटाळून पीडित मुलगी थेट मुरुड पोलिस ठाण्यात दाखल झाली.
 मुरुड पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(१) तसेच ‘बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२’ (POCSO Act) अंतर्गत कलम ४ व १७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील करीत आहेत. या घटनेतून अल्पवयीन मुलांना मोबाईल व सोशल मीडिया वापराच्या जोखमीबाबत पालकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *