माणगांव शहरातील खांदाड गावाच्या अंतर्गत रस्त्यांवर एकाच दुचाकीवर चार ते पाच युवक प्रवास करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. भरधाव वेग, रफ रायडिंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, संबंधित दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ९.४५ वाजता एका पल्सर दुचाकीवर पाच युवक, तर सकाळी ११.२० वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या दुचाकीवर चार युवक प्रवास करताना दिसून आले. शेलार नाका येथून मोर्बा रोडकडे जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या अंतर्गत रस्त्यावर शाळकरी मुलांसह पादचारी आणि शेतकऱ्यांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे बेदरकार वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
या मार्गावर काही ठिकाणी गतिरोधक असूनही बेशिस्त दुचाकीस्वारांवर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी नियमित गस्त वाढवून उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणाऱ्या तसेच भरधाव व बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अपघात होण्यापूर्वीच संबंधित यंत्रणांनी हस्तक्षेप करून खांदाडच्या अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षित करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.