पुनाडे येथील सरकारी जमिनीचा वापर स्थानिकांसाठी व्हावा; स्वामीनारायण ट्रस्टला देण्याचा सरकारचा निर्णय दुर्दैवी

तिसऱ्या मुंबईतील शेतकऱ्यांनो सावधान!
उरण | विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यातील मौजे पुनाडे येथील ३७.५१५ हेक्टर म्हणजे ९२.७० एकर सरकारी जमीन बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण ट्रस्टला विश्वविद्यापीठ उभारण्यासाठी देण्याचा सरकारचा निर्णय दुर्दैवी असून सदर जमीन स्थानिकांच्या वापरांसाठी कायम रहावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उरण पंचायत समिती सदस्या कविता रूपेश पाटील यांनी  पंचायत समितीच्या मासिक बैठकीत मांडत विरोधाचा ठराव घेण्याची सूचना केली. 
मौजे पूनाडे हद्दीत सरकारी खराबा, आकारी पड, महाराष्ट्र राज्य सरकार, गुरचरण असा कब्जेदार तपशील असलेले सुमारे ११९.५९२ हेक्टर (२९५.५२ एकर) जमीन आहे. यापैकी अर्जदार स्वामिनारायण संस्थेने मौजे पुनाडे येथील सर्वे क्रमांक १/२७ व इतर येथील ११३.८६२ हेक्टर जमिनीपैकी      वाटपास उपलब्ध असलेल्या ३७.५१५ हेक्टर जागेची मागणी केली होती. १३.६०५ हेक्टर गुरचरणाखालील , ७.२१२ हेक्टर धरणाकडील व ५५.५३ हेक्टर वनविभागाकडील अशी वाटपास उपलब्ध असलेली ३७.५१५ हेक्टर जमीन आहे.
सदर जमीन सलग स्वरूपात आहे किंवा कसे याबाबत पडताळणी करण्यात यावी व तसा तपशील शासनास सादर करण्याबाबत व वरील सर्व क्षेत्राची शासकीय मोजणी करण्याचे पत्र संदीपान देवणे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी रायगड यांना दिले होते. यानुसार येथे शासकीय मोजणीस आलेल्यांना पुनाडे ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्यात आली. व पुढील कार्यवाही सुरू आहे. विश्वविद्यालय उभारण्यासाठी स्वामीनारायण संस्था राज्य सरकारकडे जागेची मागणी करते आणि राज्य सरकारही जलद गतीने प्रतिसाद देत  आवश्यक ते सोपस्कार पार पाडत आहे हे अविश्वसनीय आहे. 
  कविता रूपेश पाटील यांनी आमच्या प्रातिनिधिशी बोलताना सांगितले की महसूल विभागाने या जमिनीचा वापर येथील स्थानिकांना भविष्यात काय कसा करता येऊ शकतो याचा विचार करणे गरजेचे होते.  लवकरच जिल्हाधिकारी रायगड यांची भेट घेऊन सदर जमीन पुनाडे ग्रामस्थांना वाढीव गावठाणासाठी राखण्यात यावी अशी मागणी करण्यात येईल. या परिसर क्षेत्रात पुनाडे धरण आहे. येथे सुंदर उद्यान (बाग ), खेळाचे मैदान उभे करता येईल.  येथील शासकीय वनजमिनीवर उपजीविकेसाठी आदिवासी समाज शेती करत आहे त्यांना वनपट्टे देता येतील . त्याचबरोबर पूर्व विभागाला कचाऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी क्षेपणभूमी (डंपिग ग्राउंड) उभी करता येईल. याबाबी जिल्हाधिकारी रायगड यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी व स्वामीनारायन संस्थेला देण्यात येणाऱ्या जागेचा फेरविचार शासनाने करावा अशी मागणी घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण प्रयत्न करणार असल्याचे पंचायत समिती सदस्या कविता पाटील यांनी सांगितले .  
———————————————-
स्वामीनारायण संस्थेला विश्वविद्यालय उभे करण्यासाठी सदर जमीन देण्याचा निर्णय दुर्दैवी असून पुनाडे गावाच्या वाढीव गावठाणासाठी, खेळाचे मैदान, उद्यान (बाग) उभारण्यासाठी, आदिवास्यांना उपजीविकेसाठी वनपट्टे देण्यासाठी त्याचबरोबर भविष्यातील कचऱ्याची समस्या ओळखून क्षेपणभूमी उभरण्यासाठी करता येईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार.” सरकारी बाबूंच्या धोरणांना विरोध दर्शवला नाही तर गावांच्या हद्दीतील अशा सरकारी जमिनी खासगी संस्था गिळंकृत करतील..
   – कविता रुपेश पाटील 
   पंचायत समिती सदस्या 
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे