पनवेल कापड बाजारातील महालक्ष्मी मेटल मार्टमधून गर्दीचा फायदा घेत ३० हजार रुपये किमतीच्या दोन मोठ्या पितळी समया चोरी करणाऱ्या दोघांपैकी एका आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. अर्जुन गायकवाड (वय ३५, रा. अंबरनाथ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी एका आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सदर तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, पोलीस नाईक अनिल चव्हाण, पोलीस शिपाई साईनाथ मोकल, अभिजित गडकरी, दत्ता जाधव, सचिन कोर तसेच महिला पोलीस शिपाई भगत आणि सवार यांनी ही कारवाई केली.