देशातील नामांकित गृहनिर्माण वित्त संस्था LIC Housing Finance Limited (LIC HFL) ने देशभरातील विविध कार्यालयांसाठी ज्युनियर असिस्टंट पदांची मोठी भरती जाहीर केली आहे. एकूण १८० पदांसाठी ही भरती होत असून महाराष्ट्र राज्यात तब्बल २५ जागा उपलब्ध आहेत. पदवीधर तरुणांसाठी ही नोकरीची चांगली संधी मानली जात आहे.
या भरतीत अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर येथे प्रत्येकी १ जागा, मुंबई/नवी मुंबई/ठाणे येथे ८, नागपूर ३, नाशिक ५ आणि पुणे/पिंपरी-चिंचवड येथे ३ पदे रिक्त आहेत. उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील किमान ५५ टक्के गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे. मात्र, दूरस्थ किंवा पत्रव्यवहार पद्धतीने घेतलेली पदवी ग्राह्य धरली जाणार नाही. संगणकाचे मूलभूत ज्ञानही अनिवार्य आहे.
१ एप्रिल २०२६ रोजी उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षे दरम्यान असावे. निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला सहा महिन्यांचा प्रोबेशन कालावधी असेल, जो आवश्यकतेनुसार वाढविला जाऊ शकतो. वेतन संरचनेनुसार दरमहा सुमारे ३८,७०९ ते ४१,५०९ रुपये इतका पगार मिळणार असून त्यासोबत मेडिक्लेम, ग्रॅच्युईटी, ग्रुप इन्शुरन्स, हाऊसिंग लोन आणि इतर सुविधा दिल्या जाणार आहेत.
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात जून २०२६ च्या पहिल्या आठवड्यात ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत २०० गुणांचे २०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. इंग्रजी भाषा, लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस (विशेषतः हाऊसिंग फायनान्स क्षेत्र), न्यूमरिकल अॅबिलिटी आणि कॉम्प्युटर स्किल या विषयांचा समावेश असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जाणार आहेत. परीक्षेनंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल आणि अंतिम निवड ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीही अनिवार्य असेल. अर्जासाठी ८०० रुपये शुल्क (१८% जीएसटी अतिरिक्त) भरावे लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइनअर्ज http://www.lichousing.com या वेबसाईटवर ३० एपिल २०२६ पर्यंत करावेत. . परीक्षा केंद्रांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, कोल्हापूर, जळगाव यांचा समावेश आहे.
ही भरती प्रक्रिया तरुणांना बँकिंग व वित्त क्षेत्रात करिअर घडवण्याची मोठी संधी देणारी ठरणार आहे.