सुमारे 32 कोटी रुपयांच्या एमडी अमलीपदार्थ तस्करीप्रकरणात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आणि गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेला संशयित आरोपी वसी उर्फ छोटू कमर अहमद अन्सारी (वय 27) याला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने तळोजा पोलिसांच्या मदतीने अटक केली. अटकेवेळी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून त्याच्याविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील रहिवासी असलेला वसी अन्सारी हा सध्या तळोजा फेज-2 येथील साईधाम सोसायटीमध्ये भाड्याने राहत होता. मागील वर्षी कोनगाव पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या 32 कोटी रुपयांच्या एमडी अमलीपदार्थ जप्ती प्रकरणात तो फरार आरोपी होता. तपासादरम्यान अमलीपदार्थाच्या विक्री व वितरण साखळीत त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आले होते. फरारीनंतर तो वारंवार ठिकाणे बदलत असल्याची माहिती तांत्रिक तपासातून मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते.
नेरूळ, तळोजा, डायघर आणि परिसरातील विविध ठिकाणी त्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखा, भिवंडी घटक-2च्या पथकाने तळोजा पोलिसांच्या मदतीने सेक्टर-19 येथील साईधाम सोसायटीमध्ये सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता सुमारे 50 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 900 रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयाने 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पिस्तूल त्याला कुठून आणि कोणाकडून मिळाले याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश येवले करीत आहेत.