स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य तथा व्यावसायिक अविनाश अनिल नलावडे (वय ३४, रा. सणसवाडी, ता. माणगाव, जि. रायगड) यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील निर्जन ठिकाणी बोलावून त्यांच्यासह साथीदारांवर जीवघेणा हल्ला करत तब्बल ५२ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात १४ ते १६ जणांविरुद्ध दरोडा, फसवणूक आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश नलावडे हे बांधकाम साहित्य पुरवठ्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या व्यवसायात गेल्या चार वर्षांपासून काम करणारे राजू मोहिते व त्याचा भाऊ अक्षय मोहिते यांनी बापू पवार नावाच्या व्यक्तीची ओळख करून दिली होती. पवार याने स्वतःकडे मोठ्या प्रमाणात सोने असल्याचे सांगत अर्धा किलो वजनाचा सोन्याचा तुकडा दाखविला. त्यातील काही नाणी तपासल्यानंतर ते सोने खरे असल्याचे समोर आल्याने आरोपींनी नलावडे यांना चार किलो सोने प्रतिकिलो २५ लाख रुपयांना विकण्याचे आमिष दाखवले.
गुरुवारी (४ जून) नलावडे हे ४६ लाख रुपये रोख रक्कम, सराफ व्यावसायिक सोनाराम मोतीराम माळी, चालक प्रकाश जंगम आणि इतर सहकाऱ्यांसह व्यवहारासाठी रवाना झाले. मात्र आरोपींनी वारंवार ठिकाण बदलत त्यांना चाकण, सुपा, रायतळे, स्टेशन सारोळा आणि अखेरीस अहिल्यानगर तालुक्यातील बुरुडगाव शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळील निर्जन रस्त्यावर बोलावले.
तेथे बापू पवार कथित सोने दाखवत असताना राजू मोहिते याने अचानक शिट्टी वाजवली. त्यानंतर उसाच्या शेतात दबा धरून बसलेले अक्षय मोहितेसह १० ते १२ जण बाहेर आले. आरोपींनी नलावडे यांना वाहनातून ओढून बाहेर काढत लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. चालक प्रकाश जंगम आणि सराफ व्यावसायिक सोनाराम माळी यांनाही गंभीर मारहाण करण्यात आली.
हल्ल्यानंतर आरोपींनी वाहनातील ४६ लाख रुपये रोख रक्कम, साडेतीन तोळ्यांची सोन्याची साखळी, एक लाख रुपये किमतीचे लॉकेट तसेच अडीच तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ५२ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लुटून पसार झाले.
जखमी अविनाश नलावडे यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून राजू मोहिते, अक्षय मोहिते (दोघे रा. नांदेड), बापू पवार व त्याचा भाऊ (रा. हिंगोली) तसेच इतर १० ते १२ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे करत आहेत.
दरम्यान, स्वस्तात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकांना जाळ्यात ओढून लुटण्याच्या घटना अहिल्यानगर, श्रीगोंदे व कोपरगाव परिसरात यापूर्वीही घडल्या आहेत. अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना केले आहे.