श्रीवर्धन तालुक्यातील मौजे बोर्ली पंचतन येथील श्री.मोहनलाल सोनी विद्यालय आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कापोली येथील न्यू मॉर्डन हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना आज शनिवार दि.३ ऑक्टोबर रोजी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या लीलाबाई ठाकर्सी कॉलेज ऑफ नर्सिंग,चर्चगेट यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कुलगुरू निधीअंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी समुदायाभिमुख आरोग्य जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन प्रक्रिया (सीपीआर) याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देण्यात आले.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू माननीय प्रा. डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या सहकार्यातून, तसेच लीलाबाई ठाकर्सी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शोभा गायकवाड यांच्या सहकार्याने, कुलगुरू निधीअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत श्री मोहनलाल सोनी विद्यालय बोर्ली पंचतन व गोखले एज्युकेशन सोसायटी,न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल कापोली येथील इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत सीपीआर कशा पद्धतीने द्यावा, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.दोन्ही शाळेतील प्राचार्य येळमंते सर व मुरकर सर यांचे आभार.कृत्रिम मानवी प्रतिकृतीच्या साहाय्याने सीपीआर देण्याची योग्य पद्धत विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष सीपीआर करून पाहण्याची संधी देण्यात आली. एखाद्या व्यक्तीची हृदयक्रिया अचानक बंद पडल्यास, पाण्यात बुडाल्यास किंवा विजेचा धक्का बसल्यास तत्काळ कोणती प्राथमिक मदत करावी, आपत्कालीन वैद्यकीय मदत कशी मागवावी आणि वैद्यकीय मदत मिळेपर्यंत सीपीआर कोणत्या पद्धतीने द्यावा, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आपत्कालीन प्रसंगी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केलेली प्राथमिक मदत जीव वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते, याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
लीलाबाई ठाकर्सी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. किर्ती मंगेश जामदार यांनी विद्यार्थ्यांना सीपीआरची शास्त्रीय पद्धत समजावून सांगत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. हा उपक्रम केवळ एका शाळेपुरता मर्यादित न राहता श्रीवर्धन तालुक्यातील सुमारे चार ते पाच शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना कृत्रिम मानवी प्रतिकृतीच्या साहाय्याने सीपीआरचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता योग्य वेळी योग्य ती मदत करण्यासाठी त्यांना सक्षम करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी श्रीवर्धन तालुक्याचे शिक्षण अधिकारी श्री. रमेश चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य आणि आवश्यक प्रशासकीय समन्वय लाभत आहे.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता आपत्कालीन प्रसंगी प्रत्यक्ष उपयोगी पडणारी जीवनरक्षक कौशल्ये आत्मसात करून देणे, तसेच समाजात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले…