विद्यार्थ्यांना दिलासा; वसतिगृह व स्वयंम योजनेच्या अर्जासाठी मुदतवाढ

रायगड | प्रतिनिधी 
इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तसेच पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे रायगड-अलिबागचे सहाय्यक संचालक सुनिल जाधव यांनी दिली.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात बारावीनंतर व्यावसायिक तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी या योजना राबविण्यात येत आहेत. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (OBC/SBC/VJNT/NT-A, B, D) आणि पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना (NT-C) अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनांसाठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर सुरू आहे. अर्ज भरताना तांत्रिक अडचणी, ऑनलाइन अर्ज सादर न होणे किंवा प्रक्रियेबाबत अन्य अडथळे निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या रायगड-अलिबाग येथील सहाय्यक संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुदतवाढीचा लाभ घेत पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज वेळेत पूर्ण करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे.