विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात आणि नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार, २३ जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कर्जत व नेरळ परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एकजूट व्यक्त केली.
कर्जतमध्ये सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे, तर नेरळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी घोषणाबाजी करण्यात आली तसेच शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि परीक्षा प्रक्रियेत विश्वासार्हता कायम राखण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलकांनी, “हा प्रश्न केवळ नीट परीक्षेपुरता मर्यादित नसून देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्यासाठीचा आहे,” असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अबाधित राहावा आणि परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा बंद कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी आणि प्रामाणिक परीक्षाव्यवस्थेच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आला आहे.
या बंदला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आझाद समाज पार्टी, बहुजन समाज पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच कर्जत प्रेस असोसिएशन यांनी पाठिंबा दर्शविला. विविध पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले.
आंदोलन शांततेत पार पडले. बंदला ही कजर्त, नेरळविद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित प्रश्नांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेत शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.