पेण एज्युकेशन सोसायटीच्या माजी मुख्याध्यापिका आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या शिक्षण तज्ञ श्रीमती कलावती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज पेण नगरपालिकेच्या शाळा क्रमांक दोन (मराठी माध्यम) येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या उपक्रमात मुख्याध्यापिका सुनिता म्हात्रे, शिक्षिका योगिता कर्णेकर, तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, विजय चव्हाण, संजय खांडेकर, पार्थ शहा, राकेश सांडे, युवा नेते हितेश पाटील, प्रसाद पाटील, हेमंत गुरव, साईश खांडेकर यांची उपस्थिती लाभली. परिसरातील महिला मंडळांनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
कलावती पाटील या स्वतः शिक्षण क्षेत्रातील असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या गरजा आणि अडचणी त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहेत. त्याच जाणिवेने त्यांनी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आणि शाळेच्या शिक्षक, विद्यार्थी व परिसरातील नागरिकांना एकत्र करून हा उपक्रम राबविला.
वह्या, पेन्सिल बॉक्स, खोडरबर इ. शालेय साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. विद्यार्थ्यांनी दिलेल्या शुभेच्छांना उत्तर देताना कलावती पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली.
मुख्याध्यापिका सुनिता म्हात्रे यांनी दरवर्षी कलावती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात येते, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.