वन -वे व्यवस्थेत बदल घडल्याशिवाय पर्यटन क्रांती अशक्यच – स्थानिकांचं मत

माथेरानमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीनं पर्यटकांचे हाल, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ठळक
माथेरान (मुकुंद रांजाणे) : 
१८५० मध्ये माथेरान उदयास आले, परंतु त्यावेळेस इथे येण्यासाठी नेरळ मार्गे माथेरान ह्या एकाच मार्गाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सद्यस्थितीत इथल्या पर्यटनाला चालना मिळत नाही.याठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा नेरळ मार्गे असल्याने आजवर स्थानिकांसह पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. वीज, पाणी आणि वाहतूक व्यवस्था हे मुख्य स्त्रोत याच मार्गे आहेत, त्यामुळे अनेकदा विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास पाणीपुरवठा नियमितपणे होत नाही तर रहदारी साठी ह्याच घाट रस्त्यातून मार्गक्रमण करावे लागते त्यामुळे ऐन सुट्ट्यांच्या हंगामात वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांची तारांबळ उडते.
मागील काळात २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीमुळे घाटरस्ता आणि मिनिट्रेनचा मार्ग वाहून गेला होता त्यावेळी मिनिट्रेन सुध्दा जवळपास दोन वर्षे बंद करण्यात आली होती. त्यावेळी काहीकाळ लोकांचा जगाशी संबंध तुटला होता. सातत्याने विजेच्या लपंडावामुळे आर्थिक व्यवस्था कोलमडून जात असून याचा पर्यटनावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे.
भविष्यात मोरबे धरणातून पाण्याचा उपसा करण्यासाठी प्रयत्न केल्यास पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. पनवेल मार्गे विजेचे कनेक्शन घेतल्यास बहुतेक समस्या दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रस्तावित असणारा रोप वे प्रकल्प शासनाने हाती घेतल्यास सर्व व्यवस्था सुरळीत होऊ शकते असे जेष्ठ स्थानिक मंडळी बोलत आहेत.
========================
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पनवेल धोदाणी माथेरान या पर्यायी रस्त्याचा कोनशीला समारंभ होऊन आज जवळपास साठ वर्षे उलटून गेली तरीसुध्दा माथेरानकरांच्या या प्रमुख मागणीला अद्याप यश मिळालेलं नाही म्हणून माथेरानकरांसाठी अन्य पर्यायी मार्ग झाल्यास येथील वैद्यकीय, शैक्षणिक परिस्थितीत व येथील पर्यटन व्यवसायात सुधारणा होऊ शकते त्यामुळे आसपासच्या आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधवांना देखील रोजगार उपलब्ध होणार आहे. पार्किंगचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने याचा गांभीर्यपूर्वक विचार केल्यास जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळाला नक्की फायदा होईल. नागरिकांच्या दळणवळणा करिता नेरळ माथेरान हा एकमेव मार्ग असल्याने नागरिक पर्यटकांना शालेय विद्यार्थ्यांना खडतर प्रवास करताना अतोनात हाल सोसावे लागत आहेत, तसेच माथेरान शहराला होणारा वीजपूरवठा व पाणी पुरवठा याच मार्गांवर असल्याने यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास येथील दुरुस्तीवर अवलंबून रहावे लागत असून विद्युत पुरवठा खंडित झाल्यास सर्व व्यवस्थावर विपरीत परिणाम होत असतो पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आणि मग तीन ते चार दिवसांसाठी बुकिंग असणारे पर्यटक पुन्हा माघारी फिरतात त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायावर देखील परिणाम होत असतो याचा गांभीर्याने प्रशासन व राज्य सरकारने विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
…चंद्रकांत जाधव, माजी उपनगराध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *