लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा; ‘चार खून केले, पुढचा नंबर तुझा’ म्हणत दिली धमकी

लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा
पनवेल | प्रतिनिधी 
पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)कडे जाणाऱ्या लोकलमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका प्रवाशाने धिंगाणा घालत सहप्रवाशांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीने, “मी चार खून केले आहेत, पुढचा नंबर तुझा आहे,” अशी धमकी दिल्याने डब्यात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रसंगावधान राखत प्रवाशांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि सामूहिक हस्तक्षेपामुळे संभाव्य अनर्थ टळला.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून तो सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुरुवातीला प्रवाशांनी संबंधित व्यक्तीकडे दुर्लक्ष केले, मात्र तो अधिक आक्रमक होत अश्लील शिवीगाळ आणि धमक्या देऊ लागल्याने डब्यात तणाव निर्माण झाला. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसली तरी संबंधित व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे का किंवा त्याच्याविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी बोरिवली लोकलमध्ये प्रवाशाच्या हत्येची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकारामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करत असल्याने रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि रेल्वे पोलिसांची गस्त अधिक प्रभावी करण्याची तसेच मद्यधुंद आणि उपद्रवी प्रवाशांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.