लय भारी! ‘ही’ आहे महाराष्ट्रातील पहिली फ्री WiFi देणारी महापालिका

#Mira bhayander
PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
 राज्यातील पहिल्यांदाच एका महापालिकेने संपूर्ण शहरात मोफत वायफाय सेवा देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे नागरिकांचे मोबाइल रिचार्ज आणि इंटरनेट खर्चाचे टेन्शन मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आतापर्यंत बसस्थानकं, रेल्वे स्टेशन, मॉल, थिएटर अशा ठिकाणी फ्री वायफाय मिळत असले तरी संपूर्ण शहराला वायफाय देणारी पहिलीच महापालिका ठरणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत ही घोषणा केली. एमबीएमसी आयुक्त राधा विनोद शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मीरा रोड-भाईंदर हे देशातील वेगाने विकसित होणारे शहर असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. गेल्या 3 वर्षांत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 1,800 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांना ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचा मोफत लाभ देणारं हे वायफाय शहरासाठी “प्रगतीची नवी लाट” ठरेल, असंही सरनाईक यांनी सांगितलं.
या उपक्रमाला अधिक बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला आहे. भारतात स्टारलिंकसोबत भागीदारी करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरलं आहे. या करारामुळे केवळ मीरा-भाईंदर नव्हे तर राज्यातील दुर्गम भागांतही उपग्रह आधारित जलद इंटरनेट सेवा उपलब्ध होणार असून डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने हे मोठं पाऊल मानलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *