कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यातील चणेरा-ऊसरमार्गे रोहा हा महत्त्वाचा रस्ता गेली अनेक वर्षे रखडलेला असून, शासनाने २०२१ मध्ये मंजूर केलेल्या तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीनंतरही हा रस्ता अद्याप प्रवाशांना उपलब्ध झाला नाही. ऑक्टोबर २०२४ रोजी वर्क ऑर्डर संपल्यानंतर देखील रस्ता खुला झाला नाही, यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.
या रस्त्यामुळे रोहा–चणेरा या १९ कि.मी.च्या अंतरात तब्बल १० कि.मी.ची बचत होणार असून, रोहा रेल्वे स्टेशनपासून अलिबाग, मुरुड, फणसाड अभयारण्य, काशिद बीच, रेवदंडा आणि साळावचे गणेश मंदिर ही पर्यटनस्थळे जवळ येणार आहेत. त्याचबरोबर चणेरा पंचक्रोशीतील सुमारे ५० गावे रोह्याशी अधिक वेगाने जोडली जाणार आहेत. त्यामुळे या रस्त्याचे महत्त्व अधोरेखित होते.
शासनाच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) दिरंगाईवर संताप व्यक्त करत प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली चणेरा येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पंचक्रोशीतील सुरेश मोरे, अनिल साळावकर, शंकर दिवकर, पराग घाग, समीर वारगुडे, मनोज भायतांडेल , अरुण खानविलकर, गोपाळ धारपवार, मजिद भुरे, गजानन साळवी, चंद्रकांत चौलकर, देवळे आदींसह शेकडो ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना विचारे म्हणाले “शासनाने दिलेला निधी वापरूनही आजवर काम रखडवण्यात आले आहे. ग्रामस्थांचा संयम संपत चालला आहे. जर डिसेंबर अखेरपर्यंत रस्ता पूर्ण झाला नाही, तर यापेक्षाही उग्र आंदोलन छेडले जाईल.”
आंदोलनाच्या दबावाखाली PWD चे अभियंते विजय बागुल व अरुण पाटील यांनी डिसेंबर अखेरपर्यंत रस्ता डांबरीकरण करून पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच त्यांनी व्हिडिओ व लेखी स्वरूपात जाहीर घोषणा केली. त्यानंतरच आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
दरम्यान, राज्य शासनाने न्हावे व रोहा येथे घोषित केलेल्या ग्रोथ सेंटरच्या विकासाला या रस्त्याचा मोठा हातभार लागणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
