बस हो गई महागाई की मार, अब की बार मोदी सरकार असे खोटे आश्वासन देऊन सर्व सामान्य नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या मोदी सरकारच्या काळात महागाई गगनाला भिडली आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. झोपण्याचा सोंग घेणाऱ्या शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी रोहा काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत निवेदनद्वारे संबधित प्रशासनाला जागे केले आहे.
स्मार्ट मीटर वीज वितरण कंपनी कडून सक्तीने बसवू नये. बहूमताच्या जोरावर नगर पालिकेने सर्वसामान्य जनतेवर लादलेली अव्वा च्या सव्वा पाणीपट्टी तातडीने रद्द करावी तसेच दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेती उध्वस्त झाल्याने शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी रोहा तालुका काँग्रेस (आय) पक्षाच्या वतीने करण्यात आली.
रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या आदेशानुसार व जिल्हा उपाध्यक्ष अशफाक पानसरे, जिल्हा सरचिटणीस सुनील देशमुख,जिल्हा खजिनदार रामप्रकाश कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार(ता.५) रोजी सायंकाळी तालुका काँग्रेस पक्षाच्या शिष्ट मंडळाने रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार डॉ.किशोर देशमुख,रोहा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावतीने श्रीनिवास पाटील,तसेच महावितरणचे उप अभियंता जतीन पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी रोहे शहरातील महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र आणि तक्रार निवारण केंद्र नागरिकांच्या सोयीसाठी तळमजल्यावर स्थलांतरित करावे अशा महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष अशपाक पानसरे, जिल्हा सरचिटणीस सुनील देशमुख, जिल्हा खजिनदार रामप्रकाश कुशवाहा, कामगार नेते बशीर भूरे, अकील लंबाते, शब्बीर पानसरे, अशोक कांबळे, हरिओम टाळकुटे, खुर्शीद अधिकारी, महेश देशमुख, इक्बाल पानसरे, नवेद चोगले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.