रेवदंडा परिसरात रविवारी पहाटे झालेल्या कथित गुटखा जप्तीच्या कारवाईची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, “२२ लाखांचा गुटखा पकडला, पण गुन्हा कुठे गेला?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणामुळे रेवदंडा आणि परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार, रविवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास रेवदंडा पोलिसांनी अंदाजे २२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडूनही कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची चर्चा सुरू आहे. तसेच सुमारे साडेसात लाख रुपयांची तडजोड करून संबंधित माल सोडण्यात आल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे. या चर्चांमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू असताना देखील रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री आणि वाहतूक सुरू असल्याचा आरोप होत आहे. रेवदंडा परिसरातील एक कथित गुटखा माफिया अलिबाग तालुक्यासह मुरुड, रोहा, श्रीवर्धन आणि तळा तालुक्यांमध्ये गुटख्याचा पुरवठा करीत असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायामागे नेमका कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गुटखा विक्री आणि वाहतूक हा कायद्याने गुन्हा मानला जात असताना, कथित जप्तीनंतर संबंधितांवर काय कारवाई झाली, किती माल जप्त करण्यात आला आणि त्याची पुढील कायदेशीर प्रक्रिया काय झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.