रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर रायगड प्रशासन सज्ज

महाबळेश्वर -पोलादपूर परिसरात मुसळधार पावसाचा कहर; दीड हजारी नोंद ओलांडली
अलिबाग (अमुलकुमार जैन)
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण व पूरप्रवण गावांवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व विभागप्रमुखांची दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला. नद्यांची पातळी इशारास्तरावर पोहोचल्याने प्रशासनाने खबरदारीचे उपाय व पर्यायी व्यवस्था तपासून घेतली आहे.
जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. तहसीलदारांना आवश्यक सुविधा व साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच स्थलांतर, मदत व बचावकार्य तातडीने करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. पाटबंधारे, आरोग्य, महावितरण, बंदर व बांधकाम विभागांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी केले. सर्व शासकीय विभागांनी योग्य समन्वय साधून “अलर्ट मोड” वर कार्य करण्याचे आदेश देण्यात आले असून, नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *