गेली सतरा वर्षे काम रखडलेल्या मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 चे काम आता धीम्या गतीने का होईना चालू झाले आहे. ते काम नागोठणे हद्दीत करीत असताना महामार्गाच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणाने रविवार 22 डिसेंबर रोजी सायंकाळी महावितरणाची भूमिगत असलेली विद्युत वाहिनी केबल पोकलणच्या सहाय्याने तोडल्याने शहरासह व विभागातील गावे जवळजवळ सहा तास बत्ती गूल होऊन अंधारात राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.याबाबत महावितरणकडून कोणती कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष राहिले आहे.
नागोठणे विभागात महामार्गाचे काम करीत असताना होत असलेल्या निष्काळजीपणा वेळोवेळी समोर येत असून रस्ता खोद काम करताना कधी पाण्याची लाइन तोडणे, विद्युत लाइन तोडणे असे अनेक प्रकार होत आहेत. असाच प्रकार रविवारी सायंकाळी झाला असून नागोठणे रेल्वे ब्रिज परिसरात पोकळणच्या सहाय्याने रस्त्याचे खोदकाम करताना नागोठणे शहर व विभागाला विज पुरवठा करणारी महावितरणची केबल तोडली. याची माहिती महावितरणचे उप अभियंता नितिन जोशी यांना मिळताच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह युध्दपातळीवर काम चालू करून रात्री साधारण नऊ वाजण्याच्या दरम्यान विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले.
केबल तोडल्याने शहर व विभागाला जवळजवळ सहा तास अंधारात काढावी लागली. तसेच नागोठणे येथे दर रविवारी बाजार असल्याने यावेळी अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान झाले असून नेहमीच या ना त्या कारणांमुळे विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शहरासह विभागातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून रविवारी झालेल्या घटनेबाबत महावितरणकडून कोणती कारवाई होते? याकडे जनतेचे लक्ष राहिले आहे.
————————————–
महामार्गाचे काम चालू झाल्यापासून वारंवार सूचना देऊन सुद्धा महामार्ग ठेकेदार यांच्या निष्काळजीपणा तसेच दुर्लक्षपणा मुळे भूमिगत केबल २-३ ठिकाणी नादुरुस्त झाल्याने कंपनीचे नुकसान तसेच वीज पुरवठा खंडित झाल्याने नागोठणे विभागातील जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे. या बाबतीत रीतसर नागोठणे पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे, जेणेकरून यापुढे असा प्रकार होणार नाही.