रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारावर निवृत्त शिक्षकांचा संताप

दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची राज्यभर तपासणी
उरण | विठ्ठल ममताबादे 
रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा कारभार ढिम्म व वेळकाढू झाला असून गेल्या चार दशकांपासून निवृत्त शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आल्याची तीव्र खंत निवृत्त शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते दा. चां. कडू यांनी व्यक्त केली. उरण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील निवृत्त शिक्षकांना न्याय देण्याऐवजी त्यांचे प्रश्न कसे रखडतील, याचीच व्युहरचना शिक्षण विभागातील अधिकारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
निवृत्त शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करणे, ३१ मार्च १९९५ रोजी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या पेन्शनची परिगणना करताना मूळ वेतनात ९७ टक्के महागाई भत्ता धरून पेन्शन निश्चित करणे, गहाळ सेवापुस्तके उपलब्ध करून देणे, १ जानेवारी १९९६ पूर्वी सेवानिवृत्त पदोन्नती मुख्याध्यापकांना सुधारीत ३२५० रुपये पेन्शन मंजूर करणे, निवडश्रेणी व प्रशिक्षित शिक्षकांना सुधारीत वेतन देणे, मानीव वेतनवाढ लागू करणे आदी अनेक मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले. या धोरणामुळे वयोवृद्ध शिक्षकांना आर्थिक लाभापासून वंचित ठेवले जात असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
खोपटे येथे झालेल्या निवृत्त शिक्षक संघाच्या सभेत दा. चां. कडू यांनी जळजळीत भावना व्यक्त करत आंदोलनाशिवाय शिक्षण विभागाला जाग येणार नाही, असे स्पष्ट आवाहन केले. यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष अंकुश पाटील, उपाध्यक्ष नामदेव म्हात्रे, सरचिटणीस महादेव ठाकूर, खजिनदार बाळाराम तांडेल तसेच जिल्हा संघाचे सदस्य सदानंद कोळी, नारायण पाटील, गो. सि. पाटील, वर्षा म्हात्रे, राजेश्री भगत आदी उपस्थित होते.