रायगडमध्ये भ्रष्टाचाराविरोधात मोठं पाऊल; अँटी करप्शन ब्युरो रायगड-अलिबागची नवी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू

Alibag ACB officer
अलिबाग | अमुलकुमार जैन
भ्रष्टाचाराविरोधी लढ्याला अधिक बळ देण्यासाठी आणि पारदर्शक प्रशासन व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने अँटी करप्शन ब्युरो (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), रायगड-अलिबाग यांच्या वतीने नवीन सार्वजनिक व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक 8087821064 सुरू करण्यात आला आहे. या नव्या सेवेमुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांना लाचखोरी व भ्रष्टाचाराविरोधात थेट, सोप्या आणि जलद पद्धतीने तक्रार नोंदविता येणार आहे.
या व्हॉट्सॲप हेल्पलाईनचे उद्घाटन अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अँटी करप्शन ब्युरो रायगड युनिटच्या पोलीस उप अधीक्षक श्रीमती सरिता भोसले, पोलीस निरीक्षक निशांत धनवडे आणि पोलीस निरीक्षक नारायण सरोदे उपस्थित होते.
या हेल्पलाईनच्या माध्यमातून शासकीय कार्यालये, कंत्राटी प्रक्रिया किंवा कोणत्याही सरकारी कामात लाच मागितली जात असल्यास नागरिक थेट व्हॉट्सॲपवर तक्रार नोंदवू शकणार आहेत. तसेच भ्रष्टाचाराचा संशय असल्यासही थेट अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधता येणार आहे. याशिवाय टोल फ्री क्रमांक 1064, ऑनलाईन तक्रार संकेतस्थळ acbmaharashtra.net आणि ई-मेलद्वारेही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
कार्यक्रमात बोलताना पोलीस उप अधीक्षक श्रीमती सरिता भोसले म्हणाल्या, भ्रष्टाचाराविरोधातील लढा ही केवळ अँटी करप्शन ब्युरो किंवा शासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक जागरूक नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. लाच मागणाऱ्यांची खैर नाही, असा ठाम संदेश या हेल्पलाईनच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
त्यांनी नागरिकांना कोणताही भ्रष्ट व्यवहार आढळल्यास भीती न बाळगता त्वरित तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले.
अँटी करप्शन ब्युरो रायगड–अलिबाग कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222331 असून,
पोलीस उप अधीक्षक श्रीमती सरिता भोसले (मो. 9004374910),
पोलीस निरीक्षक निशांत धनवडे (मो. 8108355488)
आणि पोलीस निरीक्षक नारायण सरोदे (मो. 7977116231) यांच्याशीही संपर्क साधता येणार आहे. तसेच dyspacbraigad@gmail.com या ई-मेल आयडीवरही तक्रारी पाठविता येतील.
या नव्या हेल्पलाईनमुळे रायगड जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधी जनजागृतीला चालना मिळून, पारदर्शक व प्रामाणिक प्रशासनाकडे ठोस वाटचाल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *