रायगडच्या १० नगरपरिषदांचा उद्या निकाल : धनशक्ती विरुद्ध लोकशक्तीचा फैसला होणार मतपेट्यांतून

Voting nikal
महाड | मिलिंद माने 
रायगड जिल्ह्यातील कर्जत, अलिबाग, माथेरान, मुरुड, श्रीवर्धन, खोपोली, उरण, पेण, महाड व रोहा या दहा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. त्या मतदानाचा कौल उद्या, २१ डिसेंबर रोजी मतमोजणीद्वारे स्पष्ट होणार आहे. रायगडातील जनतेने दिलेल्या मतांचा पेटारा उद्या उघडणार असून, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भारतीय जनता पार्टी की शेतकरी कामगार पक्ष—यापैकी नेमका गुलाल कोणाच्या पारड्यात पडणार, याचा फैसला उद्याच होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीकडे जिल्हाभराचे लक्ष लागले असून, या निकालावरच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे राजकीय गणित ठरणार आहे. त्यामुळे उद्याचा निकाल सर्वच राजकीय पक्षांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे चित्र आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना भाजपाचा प्रभाव मर्यादित होता. मात्र यंदा परिस्थिती बदललेली असून, भाजपाचा वाढलेला प्रभाव, शेकापमधील फूट, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे भवितव्य—या सर्वांचा कस उद्याच्या निकालातून लागणार आहे. रायगडमध्ये शेकापचे अस्तित्व टिकणार की नाही, की नव्या राजकीय समीकरणांना जन्म मिळणार, हेही निकालानंतर स्पष्ट होईल.
दहा नगरपरिषदांचे मतदान तपशील पुढीलप्रमाणे :
  • कर्जत : एकूण २१,९५७ | मतदान २१,६८० | ७२.३७%
  • अलिबाग : एकूण १६,३५४ | मतदान ११,४९८ | ७०.३१%
  • माथेरान : एकूण ४,०५५ | मतदान ३,४६१ | ८५.३५%
  • मुरुड : एकूण ११,५४४ | मतदान ८,५३० | ७३.८९%
  • श्रीवर्धन : एकूण १२,६३७ | मतदान ८,३७० | ६६.२३%
  • खोपोली : एकूण ६२,०७४ | मतदान ४२,५३५ | ६८.५२%
  • उरण : एकूण २६,२१४ | मतदान १७,८०५ | ६७.९२%
  • पेण : एकूण ३३,८७५ | मतदान २३,८४५ | ७०.३९%
  • महाड : एकूण २३,१२४ | मतदान १६,४२४ | ७१.०३%
  • रोहा : एकूण १७,६६९ | मतदान १२,७०८ | ७१.९२%
दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड यांच्यासह कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. निकालानंतर मिरवणुका, फटाके व गुलाल उधळण्यास पोलिसांनी बंदी घातली असली, तरी अनेक उमेदवारांनी विजयाच्या तयारीत खालुबाजा, बँडपथक, फटाके व हार-गुच्छ सज्ज ठेवले असल्याचे चित्र आहे.
धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती या संघर्षात नेमका कौल कोणाच्या बाजूने लागतो, शेकापची घरघर थांबते की नव्या राजकीय घडामोडींना सुरुवात होते, याची उत्तरे उद्याच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *