राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; मुंबई, ठाणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; मुंबई, ठाणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शनिवारपासून (13 सप्टेंबर 2025) पुन्हा एकदा राज्यात जोरदार पाऊस सुरू झाला असून, पुढील 4-5 दिवस मुसळधार व अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
शनिवारी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रत्नागिरीत रविवारी मुसळधार पावसाचा तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याची शक्यता असून पाणी साचण्याची भीती आहे.
जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पावसाचा इशारा आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीस अडथळे येण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *