म्हसळा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेला विशाल भिमा रसाळ (वय २९) या प्रतिलिपी लिपिक तथा भूकरमापक (सर्वेअर) या कर्मचाऱ्याला ५०,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माणगाव एसटी स्टँड येथे रंगेहाथ पकडले.
सदर कारवाई १७ एप्रिल २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पथकाने केली. आरोपीने तक्रारदाराकडून मौजे वरवटणे, सर्वे नं. 52/1ब या जमिनीच्या मोजणी, आकारफोड व ‘क’ प्रत देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.
या प्रकरणी ३४ वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनंतर पडताळणी करण्यात आली, आणि आरोपीने लाचेची मागणी स्पष्टपणे केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत पथकाने सापळा रचत माणगाव एसटी स्टँडवर लाच घेताना आरोपीला पंच साक्षीदारांसमक्ष रंगेहाथ पकडले.
आरोपीविरुद्ध म्हसळा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भिसे तसेच सहाय्यक फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, पोलीस हवालदार महेश पाटील व सागर पाटील यांनी केली.
या कारवाईने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून लोकसेवकांकडून होणाऱ्या गैरव्यवहाराविरुद्ध जनतेचा विश्वास वाढविण्यात मदत होणार आहे.