मुरुड शहरात प्रसन्ना मोहन पुलेकर या स्थानिक व्यक्तीने शेअर मार्केटमधील Golden Bulls या कंपनीच्या नावाने महिन्याला १०% व्याज देण्याचे आमिष दाखवत सुमारे ५० कोटींपेक्षा जास्त रक्कम गोळा केली. अनेक पेन्शनधारक, महिला, आणि सर्वसामान्य नागरिकांनी एफ.डी. मोडून, कर्ज काढून त्याच्यावर विश्वास ठेवला. सुरुवातीस काही महिन्यांपर्यंत व्याज दिल्यानंतर त्याने पैसे देणे थांबवले आणि उडवाउडवीची उत्तरे देत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी पत्रकार परिषद घेण्यात आली असून, सुपारी संघाचे माजी चेअरमन महेश भगत, ऍड. रुपेश पाटील, ऍड. अजित चोगले, प्रणव गुरव यांच्यासह अनेक फसवणूकग्रस्त नागरिक उपस्थित होते. त्यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन देत एफ.आय.आर. दाखल करण्याची मागणी केली. पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, प्रसन्ना पुलेकरच्या विरोधात मुरुड न्यायालयात आधीच चेक बाउंसचे ८ खटले आणि कलम १३८ अंतर्गत कारवाई सुरू आहे.
महिला नागरिकांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी रिया पुलेकर (प्रसन्ना यांची पत्नी) यांच्याकडे पैसे मागितले, तेव्हा त्यांनी आत्महत्येची धमकी दिली. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांचे पैसे परत मिळणार की नाही, याबाबत चिंतेचे वातावरण आहे. फसवणुकीमधून जमवलेली रक्कम नातेवाईकांच्या नावावर मालमत्तांमध्ये गुंतवलेली असल्याचा संशय असून, त्याची चौकशी करून ती संपत्ती सरकारने जप्त करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.