मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील माडप बोगद्यानजीक बंद पडलेल्या ट्रेलरला भरधाव एर्टिगा कारने मागून जोरदार धडक दिल्याने दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. मुसळधार पावसामुळे ट्रेलर वेळेत न दिसल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईहून पुण्याकडे जाणारा अशोक लेलँड कंपनीचा ट्रेलर (MH-46/BF-4531) माडप बोगदा संपल्यानंतर कि.मी. 25/500 येथे मागील टायरचा ॲक्सल तुटल्याने शोल्डर लेनमध्ये उभा करण्यात आला होता. चालक महेंद्र कुमार (वय 39, रा. तुर्भे, नवी मुंबई) यांनी वाहनाच्या मागे रिफ्लेक्टर कोनही लावले होते. त्याचदरम्यान दादरहून पुण्याकडे सहा प्रवासी घेऊन जाणारी टी-परमिट एर्टिगा (MH-01/EW-3164) भरधाव वेगात येऊन ट्रेलरवर मागून आदळली.
या भीषण धडकेत गुलाम मुस्तफा शेख (वय 35, रा. मालदा, पश्चिम बंगाल) आणि मोहम्मद रहमान शेख (वय 32, रा. मालदा, पश्चिम बंगाल) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आयआरबीच्या रुग्णवाहिकेतून त्यांना ग्रामीण रुग्णालय, खालापूर येथे नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले. अपघातात रहीम रहूल शेख (वय 26, कुर्ला), अजगर किताबूल (वय 26, बांद्रा) आणि अलीक शेख (वय 26, कुर्ला) यांच्यासह अन्य एक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर आयआरबीच्या क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. मुसळधार पाऊस, भरधाव वेग आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून, संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.