रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात सलग मुसळधार पावसामुळे दरड कोसळून विठाबाई गायकर (वृद्ध महिला) यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी स्थानिक प्रशासनाचे काही अधिकारी तात्काळ दाखल झाले असले तरी, रायगड जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी मात्र बेपत्ता राहिले.
घटनास्थळावर अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार आदेश ढपल, आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील व पंचायत समितीचे अधिकारी काही तासांत दाखल झाले. मात्र मुरुड गट विकास अधिकारी राजेंद्र खताळ दिवसभर गैरहजर राहून रात्री उशिरा पोहोचले, तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे या घटनास्थळी आल्याच नाहीत.
याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांना विचारणा केली असता त्यांनी उद्धट प्रतिक्रिया दिली की, “अधिकारी गेले नसले तरी कामे होतात ना, त्यात अडचण काय?” अशा असंवेदनशील वक्तव्यामुळे ग्रामस्थांत तीव्र संताप पसरला आहे.
२०१९ मध्ये याच मिठेखार येथे दरड दुर्घटना घडली असताना तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी स्वतः घटनास्थळी हजेरी लावून पाहणी केली होती, याची आठवण ग्रामस्थांनी यावेळी करून दिली. त्यामुळे आजच्या प्रशासनाच्या मुजोरपणावर आणि निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.