माथेरानची राणी चार महिने घेणार विश्रांती, शटल आणि मालवाहतूक सेवा नियमित

Matheran train
कर्जत (गणेश पवार) : 
पर्यटकांचे आकर्षण असलेली नेरळ–माथेरान दरम्यान धावणारी नॅरोगेज मिनिट्रेन सेवा १ जूनपासून १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात दरड कोसळणे आणि भूस्खलनाची शक्यता लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
मात्र, पर्यटकांचा हिरमोड होऊ नये म्हणून अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा पूर्वीप्रमाणेच नियमितपणे सुरु राहणार आहे. मे अखेरीस झालेल्या जोरदार पावसामुळे अमन लॉज ते वॉटर पाईप स्थानकादरम्यान दरड कोसळल्याचे प्रकार घडले. त्यामुळे रेल्वे रुळांची पाहणी करून सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतरच सेवा पुन्हा सुरु केली जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या परिचालन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
विशेष व्यवस्था:
  • ७ जूनपासून प्रत्येक शनिवारी, सकाळी ८:५० वाजता रिकामी मिनिट्रेन नेरळहून निघेल, आणि माथेरानमध्ये पोहोचल्यावर तिला शटल सेवेत रूपांतरित केले जाईल.
  • ही शटल गाडी दुपारी २:४५ वाजता माथेरानहून परतीचा प्रवास करेल.
  • याशिवाय, दररोज (शनिवार-रविवार वगळता) सकाळी ८:२० वाजता मालवाहू मिनिट्रेन नेरळहून सुटेल आणि सूर्यास्तापूर्वी परत येईल.
मिनिट्रेन ही माथेरानच्या पर्यटनाचा गाभा असून, निसर्गाच्या कुशीतून जाणाऱ्या या प्रवासामुळे पर्यटकांना खास अनुभव मिळतो. त्यामुळेच शटल सेवा सुरु राहणार असून, पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा आनंद मिळत राहील, हे निश्चित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *