माथेरान मिनिट्रेनसाठी नवीन इंजिन्सची मागणी; पर्यटन वाढीसाठी नगराध्यक्षांचे खासदार बारणे यांना निवेदन

माथेरान | मुकुंद रांजाणे 
माथेरानची शान समजल्या जाणाऱ्या मिनिट्रेनच्या वाढीव फेऱ्यांसाठी नवीन इंजिन्स जोपर्यंत उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत नेरळ माथेरान मधील या ट्रेनच्या फेऱ्यात वाढ होऊन पर्यटन खऱ्या अर्थाने बहरू शकत नाही यासाठी लवकरच नवीन इंजिन्स उपलब्ध व्हावी या आशयाचे निवेदन विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना सुपूर्द केले.बारणे हे दि.२६ रोजी कर्जत रेल्वे स्थानकाच्या पाहणी दौऱ्यानिमित्त आले होते त्यावेळी माथेरानच्या ट्रेनचे गार्हाणे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी निवेदनाद्वारे खासदार बारणे यांना दिले.
अमन लॉज ते माथेरान स्टेशन दरम्यान जी शटल सेवा उपलब्ध आहे यामध्ये दोन मालवाहू बोग्या असून एक बोगी प्रथम दर्जा तर दोन बोग्या द्वितीय श्रेणीच्या आहेत. शटल मधून मोठया प्रमाणावर पर्यटकांची ये जा सुरू असते परंतु तीस आसनी बोग्यांमध्ये जागेअभावी तिकीट उपलब्ध होत नाही त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. यासाठी आणखीन दोन द्वितीय श्रेणीच्या बोग्या लावण्यात याव्यात. अमन लॉज पासून माथेरान स्टेशन पर्यंतचा मार्ग हा अवघड  घाटसेक्शन मध्ये येत नाही.
या रेल्वेच्या बाजूला टाकलेली खडी सततच्या रहदारीमुळे विस्कळीत होऊन पसरली जाते त्यासाठी या रेल्वेच्या दुतर्फा पेव्हर ब्लॉक लावून चालण्यायोग्य मार्ग केल्यास सर्वाना सोयीचे ठरू शकते.माथेरानला बांधकाम साहित्य मनुष्यबळाच्या वाहतूक व्यवस्थेमुळे खूपच महाग मिळते यासाठी नेरळहून पूर्वी मालगाडी सुरू होती ती पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी.जेणेकरून सर्वसामान्य लोकांना स्वस्तात सामान उपलब्ध होऊ शकते असेही चंद्रकांत चौधरी यांनी निवेदनात नमूद केले आहे.
—————————————-
-हेरिटेज दर्जा प्राप्त झालेल्या मिनिट्रेनची सेवा सर्वाना उपलब्ध होणे गरजेचे आहे. याच ट्रेनची सफर करण्यासाठी देशविदेशातील पर्यटक इथे हजेरी लावतात. नवीन इंजिन्स उपलब्ध झाल्यास निश्चितच या गाडीच्या फेऱ्या सुध्दा वाढतील त्यामुळे पर्यटन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.खासदार श्रीरंग बारणे यांचे माथेरानवर विशेष लक्ष आहे आणि ते यातून मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे.
…चंद्रकांत चौधरी, नगराध्यक्ष माथेरान नगरपालिका