माथेरानमध्ये येताना मुख्य रस्त्यावर ज्याठिकाणी खरोखरच शौचालयांची आवश्यकता आहे त्याठिकाणी क्वचितच एखादे शौचालय असून ते सुद्धा अत्यंत घाणेरड्या अवस्थेत असल्याने महिला पर्यटकांना खूपच त्रासदायक ठरत असते. मागील वर्षी तर 38 लाख रुपयांचे एक अशी आठ ते दहा एवढया महागड्या शौचालयांची गरज नसताना आणली आहेत तर काही शौचालय दस्तुरी नाक्यावर धूळ खात पडली आहेत. ही बाब अद्यापही प्रशासन आणि संबंधित जबाबदार लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या महागड्या शौचालयामध्ये सुध्दा प्रवाशांना वापर करताना कधी दरवाजे बंद होतात तर कधी लॉक उघडण्यासाठी पाच रुपयांचे नाणे टाकल्यास अधिक नाणी बाहेर पडतात अशी एकप्रकारची एटीएम मशीन बनले आहेत.येथील पांडे रोडवर असणाऱ्या मैदानात चक्क तीन शौचालय ठेवण्यात आली असून शारलोट लेक जवळ मंदिराच्या आवारात तर प्रशासनाने हद्द पार केली आहे त्याठिकाणी जुनी तीन आणि 38 लाख रुपयांचे नवीन शौचालय अशी एकूण चार शौचालय विनाकारण ठेवण्यात आले आहे. अधिक आवश्यकता नसताना देखील केवळ ह्या नवीन शौचालयांची व्यवस्था कुठेतरी असावी या हेतूने ठेऊन लोकप्रतिनिधी सुध्दा केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे. अद्यापही काही महत्त्वाच्या पॉईंट्स वर ज्याठिकाणी खरोखरच शौचालयांची गरज आहे तिथे शौचालये उपलब्ध नाहीत त्यामुळे नाईलाजाने पर्यटकांना जंगलाचा आधार घ्यावा लागत आहे.
प्रशासकीय राजवटीपासून ते आजतागायत सत्ता स्थापन होऊन सुध्दा विकास कामांच्या नावाने बोंबा दिसत आहेत. सत्ता स्थापन होऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे परंतु या सत्तेतील अंतर्गत मतभेद आणि हम करे सो कायदा अशीच परिस्थिती आजही पाहावयास मिळत आहे त्यामुळे सत्ताधारी गटाचा प्रशासनावर किंचितही अंकुश नसल्याने गावाची विकासात्मक कामे पूर्ण करण्यासाठी तसेच सत्तेचा उपभोग घेण्यास सत्ताधारी असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे या पाच वर्षात काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागतील की नाही याबाबत स्थानिकांनी आशा सोडून दिली असल्याचेही बोलले जात आहे.