माथेरान नगरपालिकेत ‘कन्यारत्न योजने’चा शुभारंभ; नगराध्यक्षांच्या मानधनातून मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक मदत

​माथेरान | 
माथेरान गिरिस्थान नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या ठरावानुसार शहरात ‘कन्यारत्न योजना’ सुरू करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी एक आदर्श उदाहरण देत आपल्या मानधनातील दरमहा मिळणारे रुपये १०,००० (दहा हजार रुपये) जानेवारी २०२६ पासून जन्मलेल्या मुलींसाठी या योजनेमध्ये देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
​या योजनेंतर्गत देण्यात येणारे धनादेश थेट फिक्स डिपॉझिट (मुदत ठेव) स्वरूपात सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. नुकताच माथेरान नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित एका विशेष कार्यक्रमात लाभार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्या उपस्थितीत हे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
​या उपक्रमामुळे माथेरानमधील नवजात मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी एक भक्कम पाया रचला गेला असून, नगर परिषदेच्या या जनहिताच्या व महिला-बालकल्याणकारी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.लाभार्थ्यांना धनादेश देताना महिला बालकल्याण समिती सभापती ऐश्वर्या निखिल शिंदे आणि अन्य लोकप्रतिनिधी,अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.