
माथेरान | मुकुंद रांजाणे
पावसाळ्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना विक्री होणाऱ्या हलक्या दर्जाच्या युज अँड थ्रो प्लास्टिक रेनकोटमुळे माथेरानच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे लक्षात आल्यानंतर नगरपरिषदेने त्यावर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पर्यटक वापरून झालेले स्वस्त प्लास्टिक रेनकोट जंगलात, रस्त्यालगत किंवा गटारांमध्ये टाकून देत असल्याने प्लास्टिक कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे गटारे तुंबणे, पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहणे, रस्त्यांची दुरवस्था होणे तसेच पर्यटकांना पायी प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत गटनेते शिवाजी शिंदे यांनी माथेरानचे पर्यावरण कायमस्वरूपी जपण्यासाठी युज अँड थ्रो प्लास्टिक रेनकोटच्या विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव मांडला होता. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून, अशा हलक्या दर्जाच्या प्लास्टिक रेनकोटची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देणारे फलक शहरात लावण्यात आले आहेत. या कारवाईअंतर्गत बंदीनंतरही विक्री करणाऱ्या एका व्यापाऱ्यावर पाच हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.
यापूर्वी काही मोजके व्यापारी अशा रेनकोटच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळवत होते. या विक्रेत्यांची पाठराखण करण्याचाही प्रयत्न झाला, मात्र त्याला यश आले नाही. सध्या बाजारात चांगल्या दर्जाचे टिकाऊ रेनकोट उपलब्ध असून पर्यटक ते वापरल्यानंतर घरी घेऊन जात असल्याचे चित्र आहे. यंदा प्रथमच अशा प्रकारची बंदी लागू करण्यात आल्याने येत्या काळात माथेरान प्लास्टिकमुक्त होण्यास मोठी मदत होणार असून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनालाही बळ मिळणार आहे.
Related