माथेरानमध्ये जबरी चोरीचा छडा; तिघांना अटक, ५.६२ लाखांचे सोनं जप्त

कर्जत | गणेश पवार
पर्यटननगरी वन ट्री हिल परिसरात घडलेल्या ज्येष्ठ दाम्पत्यावरील जबरी चोरी प्रकरणाचा छडा लावत माथेरान पोलिसांनी तिघांना अटक केली असून सुमारे ५ लाख ६२ हजार रुपयांचे सोने जप्त केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी रात्री सुमारे ९ वाजता चार दरोडेखोरांनी खरेदीच्या बहाण्याने नारायण उर्फ अप्पा कदम यांच्या घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत दाम्पत्याचे हात-पाय बांधले आणि ८ तोळे सोने तसेच दीड लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरीनंतर घराला बाहेरून कडी लावून आरोपी फरार झाले होते.
घटनेनंतर माथेरान पोलीस ठाण्याचे तत्कालीन अधिकारी अनिल सोनोने यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातील पुष्पेंद्र राम धुलारी (३२), वकील उर्फ मोहम्मद मेवाती (२६) आणि शिवम बलवीर सिंग (२०) यांना अटक करण्यात आली असून चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  
 दरम्यान, आरोपींकडून एक सोन्याचे गंठण (२९.४३० ग्रॅम), मंगळसूत्र (१०.६२० ग्रॅम), चेन (२२.१२० ग्रॅम), गळ्यातील सर, कानातील दागिने आणि नथ असा एकूण सुमारे ५,६२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरील या घटनेचा अधिक तपास माथेरान पो. उपनिरीक्षक सुशांत वरक हे करत आहेत. अल्पावधीत गुन्हा उघडकीस आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.