माथेरानच्या विकासाला नवी गती : दस्तुरी पार्किंगमध्ये विजेची सुविधा, लवकरच सीसीटीव्ही बसवणार – पर्यटकांच्या वाहन सुरक्षेसाठी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचा पुढाकार

माथेरान | मुकुंद रांजाणे  
दस्तुरी नाक्यावर सुसज्ज वाहनांची पार्किंगची सुविधा विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या माध्यमातून पूर्ण झालेली असताना याठिकाणी अंधाऱ्या रात्री पर्यटकांच्या किंमती वाहनांच्या सुरक्षेसाठी जागोजागी विजेचे पोल बसविण्यात आले असून लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे सुध्दा लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटक आपली वाहने निर्धास्तपणे पार्क करू शकतात. दस्तुरी पार्किंग मधील अतिक्रमित जागा मोकळी करून त्याठिकाणी उत्तम प्रकारे वाहने पार्किंगची सुविधा नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी केली असून जवळपास दोनशेहून अधिक गाड्या अगदी सहज पार्क केल्या जाऊ शकतात असे बोलले जात आहे.
मागील सुट्टयांच्या हंगामात पर्यटकांना नाईलाजास्तव मिळेल त्या ठिकाणी कुठेही जंगलात वाहने पार्क करावी लागत होती तसेच अनेकदा जागेअभावी पर्यटकांना घाटात तासनतास वाहतूक कोंडीमुळे त्रासदायक बनले होते. याचा इथल्या पर्यटनावर परिणाम होतांना दिसून आला होता. ही गंभीर बाब ओळखून नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी दस्तुरी नाक्यावरील अतिक्रमित जागा मोकळी करून सुसज्ज पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. तर याठिकाणी दुचाकी मधून पेट्रोल चोरीच्या घटना,तसेच वाहनातून सामान चोरीच्या घटना सुध्दा घडल्या होत्या. त्याला आळा घालण्यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याने पर्यटकांची वाहने सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.
 नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी आज दि.११ रोजी सायंकाळी स्वतः पार्किंगमध्ये जाऊन पाहणी केली असून आवश्यक जागी विजेचे पोल बसविण्याबाबत संबंधित कर्मचारी वर्गाला सूचना केल्या आहेत. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक केतन रामाणे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सकपाळ, शाकिर मुजावर तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
———————————————–
माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावरून सातत्याने पर्यटकांची रेलचेल सुरू असते. पर्यटकांवर सर्वांचे जीवनमान अवलंबून असते. त्यामुळे त्यांची एन्ट्री होताना साधी पार्किंगची सोय नसावी हे पर्यटन वाढीस धोकादायक ठरू शकते. त्यांच्या किंमती गाड्या सुरक्षित पार्क व्हाव्यात, त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहणार आहे.
-चंद्रकांत चौधरी—नगराध्यक्ष माथेरान नगरपालिका
———————————————–
यावेळी दस्तुरी पार्किंगमध्ये अगदी सहज आम्ही गाडी पार्क केली. गेल्या वर्षी याच महिन्यात आम्हाला पार्किंगसाठी जागाच उपलब्ध न झाल्यामुळे आम्ही येथून थेट लोणावळ्याला गेलो होतो. परंतु यावेळी पार्किंगची छान सोय झाल्यामुळे आमच्या कुटुंबाला समाधान वाटले.
-शंतनू आपटे—-पर्यटक मुंबई
———————————————–
पार्किंगची चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील कर्मचाऱ्यांना वाहने व्यवस्थित पार्क करण्यासाठी सूचना  केल्यास उत्तम होईल.तेथून पुढे गावात येण्यासाठी ई रिक्षांची संख्या कमी असल्यामुळे वेळ खर्च होत आहे त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
-सिद्धांत घोरपडे—पर्यटक मुंबई