माथेरानच्या रस्त्यांची धूळधाण; जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी, स्थानिकांमध्ये संताप

माथेरान | मुकुंद रांजाणे 
देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनाला मोठी गर्दी होत असली, तरी प्रमुख पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, स्वच्छतेचा अभाव आणि मूलभूत सुविधांची कमतरता यामुळे पर्यटकांमध्ये माथेरानला फिरावयास आलो ही घोडचूक झाली आहे की काय असा प्रश्न पर्यटकांना निश्चितच पडला असणार यात तिळमात्र शंका नाही. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.  
मुंबई-पुण्यापासून जवळ असल्याने माथेरानमध्ये वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. विशेषतः पावसाळ्यात शनिवार-रविवारी येथे यात्रेचे स्वरूप निर्माण होते. अनेक पर्यटक खास पायी भटकंतीसाठी येतात; मात्र विविध पॉईंट्सकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था इतकी खराब झाली आहे की, रस्त्यावरून चालत आहोत की नाल्यातून, असा प्रश्न पर्यटकांना पडत आहे. तरीही येथील निसर्गरम्य वातावरण, शांतता आणि वाहनमुक्त परिसरामुळे पर्यटक मोठ्या संख्येने माथेरानला भेट देत असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
पर्यटकांकडून प्रवेशाकरिता आकारला जाणारा कर वाढविण्यासही अनेक पर्यटकांची हरकत नसल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याबदल्यात चालण्यायोग्य स्वच्छ रस्ते, सुरळीत वाहतूक व्यवस्था, लहान मुलांसाठी उद्याने व खेळण्यांची साधने, विविध पॉईंट्सवर आकर्षक बाके, पाणपोई आणि स्वच्छ सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र या मूलभूत सुविधांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यटक व स्थानिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, रस्त्यांच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. पावसाळी बंधाऱ्यांचे योग्य नियोजन न करता कामे केली जात असून, मर्जीतील ठेकेदारांना लाभ मिळावा अशा पद्धतीने विकासकामे होत असल्याची चर्चा आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवून दर्जेदार पायाभूत सुविधा उभाराव्यात आणि माथेरानचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने करावा, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.