माणगांव पोलीस ठाण्याला आयएसओ A++ स्मार्ट पोलीस मानांकन प्राप्त; पोलिसांचं कौतुक

Mangav police
माणगांव (रविंद्र कुवेसकर) :
रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाण्याला नामांकित आयएसओ स्मार्ट A++ पोलीस ठाणे मानांकन प्रमाणपत्र, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या हस्ते दि.१९ एप्रिल २०२५ रोजी प्रदान करण्यात आले आहे. माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी हे प्रमाणपत्र अलिबाग येथे जाऊन स्वीकारले आहे.
माणगांव तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी माणगांव पोलीस नेहमी सज्ज असतात. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस अहोरात्र २४ तास आपली सेवा बजावीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलिसांचा जनसंपर्क वाढला असून जनते सोबत सलोख्याचे संबंध निर्माण झाले आहेत. स्मार्ट पोलिसिंग, संवेदनशील, आधुनिक, सतर्क, जबाबदार, विश्वसनीय, सशक्त पोलीस फौज, कर्तव्यदक्ष, कार्यक्षम इ. मुद्द्यांवरती हा पुरस्कार माणगांव पोलीस ठाण्याला प्राप्त झाला आहे. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस ठाणे सुसज्ज करण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांना बसण्यासाठी आसन, सुसज्ज इमारत, पाणपोई सध्या अनेक सुख सुविधा माणगांव पोलीस ठाणे येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. माणगांव पोलीस ठाणे कडून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत त्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात देखील माणगांव पोलिसांना यश लाभले आहे. माणगांव तालुक्यात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. शांतता व सुव्यवस्था राखण्या साठी माणगांव पोलीस अहोरात्र झटत असतात. हा पुरस्कार मिळाल्याने पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे व सर्व माणगांव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *