माणगांव नगरपंचायतीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विकास आराखडा अखेर शासनाने मंजूर केला असल्याचे निर्णयाची अधिकृत घोषणा नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी बुधवार दि.१८ जून २०२५ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता नगरपंचायत कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. या वेळी सर्व शिवसेना शिंदेगटाचे सभापती व नगरसेवक उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी सांगितले कि माणगांवच्या विकासासाठी हा आराखडा अत्यंत महत्वाचा आहे. अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या आराखड्याच्या मंजुरीसाठी आम्ही सर्वांनी शिवसेना नेते ॲड.राजीव राजीव साबळे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा केला आणि आज त्याचे सकारात्मक फलित आपल्यासमोर दिसत आहे.
नुकतेच सीबीएसई शाळेच्या उद्घाटन समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माणगांवला आले असता त्यांचेकडे सोमवार दि.९ जून रोजी विकास आराखडा मंजुरी बाबत मागणी केली होती आणि ती दहा दिवसातच १८ जूनला पूर्ण झाल्याने माणगांवकरांचे वतिने त्यांचे विशेष आभार शर्मिला सुर्वे यांनी व्यक्त केले तसेच आमचे लोकप्रिय आमदार, मंत्री भरतशेठ गोगावले यांचेही विशेष सहकार्याचा खास उल्लेख करीत खासदार सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांचे देखील सहकार्य लाभल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या पत्रकार परिषदेत पाणीपुरवठा, सामाजिक न्याय व शिक्षण समिती सभापती कपिल गायकवाड यांनी बोलताना स्पष्ट केले कि, विकास आराखड्यांतर्गत रस्ते रुंदीकरण, ड्रेनेज व्यवस्था, उद्याने, सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा माणगांवचे २५ वर्ष पुढील विकासात्मक दूरदृष्टीतून समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण आराखडा अंमलबजावणी वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे. विकास आराखडा आणि विकासकामांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत नगरसेवक सचिन बोंबले, दिनेश रातवडकर यांनीही आपली मत व्यक्त केली.
यावेळी महिला, बालकल्याण व युवक कल्याण समिती सभापती नंदिनी बामगुडे, नगरसेवक सचिन बोंबले, नगरसेवक दिनेश रातवडकर, शिवसेना उबाठाचे नगरसेवक अजित तार्लेकर, स्वीकृत नगरसेवक सुनील पवार हे देखील उपस्थित होते. माणगांव नगरपंचायतीच्या विकासाचे दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण विकास आराखडय़ाच्या पत्रकार परिषदेस नगरपंचायत मधिल राष्ट्रवादी पक्षाच्या उपनगराध्यक्षा अर्थात बांधकाम सभापती तसेच स्वच्छता-आरोग्य सभापतीसह राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक अनुपस्थित असल्याचे दिसून आल्याने नगरपंचायतमध्ये या महत्त्वपूर्ण घटनेनंतरही या अनुपस्थिचे कारण मात्र गुलदस्त्यात असल्याचे चित्र आहे.