महावितरणमधील कंत्राटी कामगारांना कायम कामगारांचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (BMS) यांनी २०१२ मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर अखेर ऐतिहासिक निर्णय आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे औद्योगिक न्यायालयात चाललेल्या १३ वर्षांच्या लढ्यानंतर न्यायमूर्ती एस. झेड. सोनभद्रे यांनी १७ जून रोजी महत्त्वपूर्ण अवॉर्ड जाहीर केला. २२८५ कामगारांच्या लढ्याला मिळालेल्या या यशाचा अधिकृत आदेश १० डिसेंबर रोजी कामगार उपायुक्त ल. य. भुजबळ यांनी संघटनेला सुपूर्द केला.
निकालानुसार कंत्राटी कामगारांना प्रत्यक्ष व कायम कामगार मानण्यात आले असून कंत्राटदार व्यवस्था “नाममात्र व बनावट” असल्याचे न्यायालयाने ठामपणे नमूद केले आहे. २०१२ पासून आतापर्यंतच्या कालावधीतील वेतन, भत्ते आणि इतर सर्व लाभ कायम कामगारांप्रमाणे फरकासह देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सहा महिन्यांत लाभ न दिल्यास प्रलंबित रकमेवर ५% व्याज देण्याची सक्तीही करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील कंत्राटीकरणाच्या चुकीच्या पद्धतींवर मोठा लगाम बसणार असून मुख्य नियोक्ता आणि कंत्राटदार दोघांनाही जबाबदार धरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे आणि मार्गदर्शक अण्णा देसाई यांनी याला कंत्राटी कामगार चळवळीच्या विजयाचा मैलाचा दगड ठरवला आहे.