महाड सुंदरवाडी हत्या प्रकरणात निर्णायक निकाल; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

Court
रायगड | अमुलकुमार जैन
महाड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सुंदरवाडी येथील बांधकाम प्रकल्पात घडलेल्या खून प्रकरणात माणगाव येथील अतिरीक्त सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरोपी जमिल मेहबुब शेख (वय ५०, रा. कवठळी, बीड) याला भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप आणि १ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी दिला.
सदर घटना ५ एप्रिल २०१८ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता घडली होती. मयत अन्सार बहादूर बेग यांच्या नवीन बांधकाम प्रकल्पात गवंडी कामगार म्हणून काम करणाऱ्या आरोपीने आधी घेतलेल्या १३ हजार रुपयांच्या अॅडव्हान्सवरून वाद निर्माण झाला. आरोपीने गावाला जाण्याची इच्छा व्यक्त केली असता, काम पूर्ण न झाल्याशिवाय जाण्यास मनाई केल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादातून आरोपीने मोठा दगड उचलून अन्सार बेग यांच्या डोक्यात घाव घातला, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आर. पी. शिंदे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाचे अति. शासकीय अभियोक्ता जितेंद्र दत्तात्रय म्हात्रे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकाऱ्यांच्या ठोस साक्षीमुळे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला. या निकालामुळे महाड परिसरातील कामगारांना न्याय मिळाल्याचा विश्वास निर्माण झाला असून, भविष्यातील गुन्हेगारी कृत्यांना कायद्याचा कठोर इशारा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *