महाडच्या कुर्ला धरणाजवळ बोकड कापून अघोरी कृत्य; नगर परिषद अनभिज्ञ, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

महाडच्या कुर्ला धरणाजवळ बोकड कापून अघोरी कृत्य
महाड | मिलिंद माने 
महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या व महाड नगर परिषदेच्या मालकीच्या असणाऱ्या कुर्ला जलाशयाजवळ बोकड कापून अघोरी विद्या करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे मात्र याबाबत नगरपालिका अनभिज्ञ आहे. नेमका हा प्रकार कशासाठी व कोणी केला असावा याबाबत मात्र समजू शकले नसले तरी या सर्व प्रकारा नंतर नगरपालिका मात्र अद्याप अंधारात असल्याचे उघड झाले आहे.
महाड विन्हेरे राज्य मार्ग रस्त्यावर महाड नगर परिषदेचे कुर्ला धरण आहे. या धरणातून महाड नगर परिषदेला पाणीपुरवठा केला जातो. कुर्ला धरणाचा परिसर हा दाट जंगलाचा असल्याने सहसा या ठिकाणी कोणी जात नाही. शिवाय आता याठिकाणी पालिकेचा कर्मचारी देखील नसतो. याचाच फायदा घेत अज्ञात व्यक्तींनी कुर्ला धरणाच्या संरक्षक भिंती जवळच बोकड कापून अघोरी विद्या करण्याचा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. याबाबतची घटना उघडकीस येताच कुर्ला धरणाच्या जवळ असणाऱ्या गोरीवले कोंड येथील ग्रामस्थ या घटनेनंतर या ठिकाणी एकत्र जमा झाले. मात्र हा आघोरी कृत्याचा प्रकार कोणी केला याबाबत मात्र नेमके कोणी सांगू शकले नाही.
कुर्ला धरणाच्या जवळ बोकड कापून त्या ठिकाणी आघोरी कृत्य केले मात्र संबंधित बोकड कापल्यानंतर त्या ठिकाणी दगडावर चुली तयार करून या बोकडाचे येथेच जेवण देखील संबंधित व्यक्तींनी केल्याचे उघड झाले आहे त्यामुळे हा प्रकार नेमका कोणी केला व कशासाठी केला असावा याबाबत चर्चा सुरु आहे. संबंधित प्रकार ज्या ठिकाणी घडला ती जागा महाड नगर परिषदेच्या ताब्यात आहे. मात्र हा प्रकार घडल्यानंतर याची सुतराम कल्पना देखील महाड नगर परिषदेला अथवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना किंवा मुख्याधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येत आहे. या घटनेने महाड नगर पालिकेच्या कुर्ला धरणाच्या सुरक्षेचा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. येथे प्रवेशद्वार असावे अशी मागणी देखील केली गेली आहे. धरण परिसरात तरुणांचा देखील वावर असल्याने दिवसाच्या वेळी तरी सुरक्षा रक्षक असावा अशी मागणी देखील केली जात आहे.