महाडचे हुतात्मा स्मारक बनले दारूचा अड्डा; दुर्गंधी आणि पार्किंगने वेढले

Mahad smarak
महाड (मिलिंद माने) :
महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेले हुतात्मा स्मारक सध्या दारुड्यांचा अड्डा, रिक्षा व मोटरसायकल पार्किंगचा जागा आणि बेवारसांची वसाहत बनले आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या सन्मानार्थ बांधण्यात आलेले हे स्मारक सायंकाळच्या वेळेस दारूच्या बाटल्यांनी भरलेले दिसत असून, महानगरपालिका प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. या परिसरात सफाईचाही अभाव असून परिसर दुर्गंधीने भरून गेलेला आहे.
स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण स्मृतीस्थानाचा अवमान:
महाड मधून स्वातंत्र्य चळवळीदरम्यान झालेल्या इंग्रजांविरोधातील उठावात गोळीबारात शहीद झालेले नारायण ऊर्फ वसंत बाळकृष्ण दाते, कमलाकर विठ्ठल दांडेकर, अर्जुन कानू भोई ऊर्फ कडू, नथू दौलत टेकवले, व विठ्ठल बिरवाडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक उभारले गेले. मात्र, आज या पवित्र जागेची अवस्था इतकी बिकट झाली आहे की येथे बेवारस लोक झोपडपट्ट्या उभारतात, नगरपालिकेच्या कचरा गाड्या येथे लावल्या जातात आणि पावसात पाण्याच्या डबक्यांनी संपूर्ण जागा भरलेली असते.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्मारकाचा अवमान:
स्मारकासमोरच नगरपालिका इमारत असूनही या ठिकाणी कुठलीही सुरक्षा व्यवस्था, देखभाल किंवा स्वच्छतेची सोय नाही. हुतात्म्यांच्या स्मृतींचा असा अवमान होत असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. यासंदर्भात महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. नागरिकांमध्ये मात्र याविरोधात तीव्र नाराजी असून स्मारकाची त्वरित दुरुस्ती, स्वच्छता व सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *