महाड शहरातून दररोज हजारो टन कचरा गोळा होतो आणि तो लाडवली येथील धनकचरा व्यवस्थापन जागेवर टाकला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे वर्गीकरण ठप्प असल्याने व सततच्या पावसामुळे कचऱ्यातून दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे लाडवली परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले असून श्वसनाचे विकार, डोकेदुखी यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत.
नगरपरिषदेच्या ठेकेदाराकडून गोळा केलेला ओला-सुका कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकल्यानंतर त्याचे व्यवस्थित वर्गीकरण व रासायनिक फवारणी करण्याची जबाबदारी असतानाही हे काम होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ठेकेदाराने कचरा अस्ताव्यस्त पसरून ठेवला असून त्यातून घातक परिणाम होत असल्याची चर्चा आहे.
लाडवली ग्रामपंचायत हद्दीतील ५०० हून अधिक नागरिक रोज दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे त्रस्त होत आहेत. नगरपरिषद प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परिस्थिती कायम राहिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.