मनसेच्या मागणीनुसार आरोपींना अटक झाल्याने “महाड बंद” तूर्तास स्थगित

Mahad police bandobasta
Mahad police bandobasta
महाड | मिलिंद माने 
महाड मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांना शिवसेना शिंदे गटाने केलेल्या मारहाणीनंतर आरोपींना अटक न झाल्यास १० नोव्हेंबर रोजी महाड बंदचा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला होता. मात्र, पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजीच सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मिळाला. त्यामुळे मनसेने महाड बंद तूर्त स्थगित केला असला तरी, आज (१० नोव्हेंबर) महाड शहरात नाक्या-नाक्यावर कडक पोलिस बंदोबस्त पाहायला मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, चवदार तळे, साळवाडी नाका, पिंपळपार, सुकट गल्ली, भगवानदास बेकरी, अय्यंगार बेकरी, लायन्स क्लब, जय अंबे कॉर्नर आणि नवे नगर परिसरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी सांगितले की, मनसेचा मोर्चा आयोजित होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मनसेने स्पष्ट केले आहे की, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून पुढील कायदेशीर लढा ते लढणार आहेत. या संपूर्ण प्रकरणात मनसेला महाविकास आघाडीचे घटक पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समर्थक आणि अन्य हितचिंतकांचा मिळालेला पाठिंबा त्यांनी मान्य केला आहे. दरम्यान, या प्रकरणात मनसे पदाधिकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते चेतन उर्फ बंटी पोटफोडे आणि प्रफुल धोंडगे यांनाही प्रतिबंधक नोटिसा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *