मुंबई गोवा महामार्गावर बस दरीत कोसळली; 22 जखमी प्रवाशांपैकी 10 प्रवासी गंभीर

Mini bus falls into ravine near Bhogao
पोलादपूर | शैलेश पालकर 
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामाग क्रमांक 66 वर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोगाव बुद्रुक नजिक सोमवार, दि. 24 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. स्वारगेट पुणे ते दापोलीपर्यंत जाणारी खासगी मिनी बस महामार्गावरील पुलाच्या अलिकडे रिफ्लेक्टर नसलेल्या लोखंडी संरक्षक कठडयांना धडक देत लोखंडी कठडयांसह अंदाजे 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 22 प्रवाशी जखमी झाले असून त्यातील 10 प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोलादपूर ते खेड दरम्यानच्या भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या महामार्गाचे काम सुरू असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. पहाटे धुके असल्याने रिफ्लेक्टर नसलेले लोखंडी संरक्षक कठडे चालक सूरज गागनाथ अलकुंटे (वय 25, रा.कात्रज, पुणे, मूळ रा.अलकुंटे, जि.सोलापूर) याच्या नजरेस न पडल्याने या लोखंडी संरक्षक कठडयांना श्रीसाई ट्रॅव्हल्सची मिनी बस (एमएच  12 वायबी 2835)ची धडक बसताच लोखंडी कठडेदेखील काँक्रीटने जमिनीत ठासले नसल्याने लोखंडी कठडयांसह मिनीबस थेट दरीकडे झेपावली. यावेळी बसमधील प्रवाशांच्या किंचाळण्यासह बसच्या धडकेमुळे लोखंडी कठडयांचा कर्णकर्कश्य आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि मिनीबसमधील जखमींना महामार्गावर आणले. पोलादपूर पोलीस व महामार्ग सुरक्षा पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू करीत जखमींना खेड-कळंबणी येथील रत्नागिरी उपजिल्हा रूग्णालयामध्ये दाखल केले.
खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शामल विजय आंजर्लेकर (वय 40, रा. गिम्हवणे, दापोली), काजल मारुती शिगवण (वय 23, रा. दमामे, दापोली), दिलीप शिवराम मोहिते (वय 55, रा. तळसर, चिपळूण), अमरनाथ मिलिंद कांबळे (वय 27, किल्लारी,रा. लातूर), दिपाली दत्ताराम काचरे (वय 27, रा. भडवणे, दापोली), प्रतिक प्रकाश गुरव (वय 22, रा. शिरवली, खेड), प्रिया प्रकाश गुरव (वय 23 रा. शिरवली, खेड), आनंदी बालाजी नाचरे (वय 74 रा. दमामे, दापोली), सर्वेश दीपक गुहागरकर (वय 22 रा. आडे, दापोली), मुजिब अल्लाबकाश दलाल (वय 19, काळकाई कोंड, दापोली), मयुरी मारुती शिगवण (वय 45 रा. दमामे, दापोली) याशिवाय चालक, वाहक तसेच इतर 9 प्रवाशांना चिपळूण येथील खासगी रुग्णालयात तसेच डेरवण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
या अपघाताची फिर्याद नयना स्वप्नील कालेकर (वय 35, रा.जालगांव, ता.दापोली) या प्रवासी महिला शिक्षिकेने दिल्यानुसार पोलादपूर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बामणे यांनी र.नं. 104-2025 भा.न्या.सं.कलम 281, 125(अ), 125(ब), मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार मिनीबस चालक सूरज गागनाथ अलकुंटे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पहाटेच्या सुमारास अपघातस्थळी वाहतूक कोंडी झाल्याने महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष पथके तैनात केली. थंडी-धुके पसरले असताना महामार्गाचे काम सुरू असताना रिफ्लेक्टर नसलेल्या आणि विना काँक्रीट कमकुवतपणे ठासलेल्या लोखंडी संरक्षक कठडे यामुळे हा अपघात झाला असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच महामार्गालगतचे लोखंडी संरक्षक कठडेदेखील कमकुवत असल्याचे या अपघातावेळी लोखंडी संरक्षक कठडे मिनीसोबतच दरीमध्ये झेपावल्याने उघड झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *