रायगड | अमुलकुमार जैन
स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांवरील लैंगिक शोषण आणि छळाच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या खरात याचे अनेक प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध एकामागोमाग समोर येत आहेत. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा रायगड चे खासदार सुनील तटकरे यांचे नाव पुढे आल्याने प्रकरण अधिकच गाजू लागले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे वास्तव्यास असलेल्या खरात याच्यावर महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप असून, त्याच्या घरातून शस्त्रे आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तपासादरम्यान अनेक राजकारणी, सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींशी त्याचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. विशेषतः काही राजकीय नेत्यांशी असलेली त्याची जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, तटकरे यांचे खरातसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो खरातच्या मुलाच्या लग्नातील असल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वीही काही नेत्यांचे फोटो समोर आले होते, मात्र तटकरे यांच्या नावामुळे या प्रकरणाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यासह इतर काही नेत्यांचेही फोटो आणि व्हिडिओ याआधी समोर आले होते. त्यामुळे या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात येत असून, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, तपास यंत्रणा या प्रकरणाचा बारकाईने तपास करत असून, पुढील काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे राजकीय प्रतिमांवर परिणाम होण्याची शक्यता असून, संपूर्ण राज्याचे लक्ष आता या प्रकरणाकडे लागले आहे.



