उरण तालुक्यातील बोकडवीरा येथे एमएसईबी वीज निर्मिती प्रकल्पाच्या बाजूला असलेला उड्डाणपूल सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून तो अक्षरशः आधाराची वाट पाहत उभा असल्याचे चित्र समोर आले आहे. अवजड वाहतूक सुरळीत राहावी आणि बंदराकडे जाणाऱ्या कंटेनरची वाहतूक वेळेत व्हावी या उद्देशाने सुमारे पाच वर्षांपूर्वी हा उड्डाणपूल उभारण्यात आला होता. मात्र आज या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून वाहनचालकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान पुलाच्या मध्यभागी मोठे तडे गेले असून तो सुमारे एक फूट खचल्याचे दिसून आले आहे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंचे संरक्षक कठडे तुटले असून टोकाला मोठी भगदाडे पडली आहेत. या पुलावरून अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरू असल्याने परिस्थिती आणखी धोकादायक बनली आहे. सध्या प्रशासनाने जड वाहतूक बंद करून फक्त हलकी वाहने सुरू ठेवली असली तरी पर्यायी मार्ग नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे.
द्रोणागिरी नोडमध्ये धोक्यांची मालिका कायम
ही परिस्थिती नवीन नसून १४ मार्च २०२१ रोजी द्रोणागिरी नोडमधील सेक्टर १५ मधील फुंडे गावाजवळ बॉक्स कल्व्हर्टचा स्लॅब कोसळून दीपक कसूरकर या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर सिडकोने स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र तरीही परिसरातील उड्डाणपूलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
यापूर्वी जासई गावाजवळ उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू असताना काही भाग कोसळला होता. तसेच इतर उड्डाणपूलांच्या मजबुतीवरही अनेकदा प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे बोकडवीरा येथील पूल हा आणखी एका मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
औद्योगिक विकासालाही बसू शकतो फटका
बोकडवीरा येथे महानिर्मितीचा औष्णिक वीज प्रकल्प असून राज्यातील वीजपुरवठ्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. तसेच महापारेषणच्या बाभळेश्वर-कुडूस २२८ किमी वीजवाहिनीमुळे मुंबई, ठाणे व पालघर परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम होणार आहे. मात्र या भागातील रस्ते आणि पुलांची खराब अवस्था औद्योगिक विकासाला अडथळा ठरू शकते.
नागरिकांची तातडीच्या कारवाईची मागणी
स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि लोकप्रतिनिधींनी या उड्डाणपूलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच सिडको, एमएसईबी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा उरणमध्ये मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.