रायगड जिल्ह्यातील पेझारी–नागोठणे रस्त्यालगत असणाऱ्या बेणसे सिध्दार्थनगर येथील शेततलावात पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बुडणाऱ्यांमध्ये जोहेब जाकीर अत्तर (17), मिझान जाकीर अत्तार (14), अश्फाक अली (16) यांचा समावेश आहे. हे तिघे पोहण्यासाठी तलावात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने गोंधळून गेले आणि बुडू लागले. घटनास्थळी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी पो.नि. सचिन कुलकर्णी, पोलीस कर्मचारी व गावातील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून तिघांना बाहेर काढले.
तत्काळ रिलायन्स फॅमिली वेल्फेअर सेंटर, नागोठणे येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना वडखळ येथील संजिवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले. सध्या तिघांवर उपचार सुरू असून प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष आहे.
घटनेनंतर पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन उपचाराबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश दिले.
दरम्यान, शेततलाव परिसरात शेतीवर जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने बचाव कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला. नागरिकांनी बुडालेल्या तरुणांना खांद्यावर उचलून मुख्य रस्त्यावर आणले. स्थानिक तरुणांनी वेळेवर मदतकार्य करून मोलाची भूमिका बजावली.
या घटनेमुळे नागोठणे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी अशा ठिकाणी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.