तालुक्यातील दुर्गम भागातील शिक्षणविषयक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पोलादपूर पंचायत समिती कार्यालयासमोर निष्क्रिय शिक्षण विभागाच्या विरोधात प्रतिकात्मक शाळा आंदोलन करण्यात आले. शिक्षण विभागातील मनमानी, दुर्लक्ष व ढिसाळ कारभार याचा निषेध व्यक्त करत आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, शैक्षणिक सुविधा अभाव, शालेय पोषण आहार अनियमितता विद्यार्थी दाखले अडवणूक, निवेदने तक्रारी यावर न होणारी प्रभावी कार्यवाही या पोलादपूर शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर प्रशासनाला वेळोवेळी निवेदने, आमरण उपोषण व आंदोलने करूनही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. तहसीलदार, जिल्हा शिक्षण अधिकारी,गट विकास अधिकारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्रांनाच जर उत्तरे मिळत नसतील तर सामान्य नागरिकांना काय उत्तरे मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच पत्रांना पोलादपूर शिक्षण विभागाकडून दूर्लक्षित करण्यात आल्याचे उघड झाले.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शिक्षण विभागाच्या गोंधळाचा निष्क्रियतेचा प्रातिनिधिक पध्दतीने अनुभव देण्यासाठी शिक्षण विभागाची प्रतिकात्मक शाळा घेऊन आंदोलन केले. शिक्षण विभागातील गोंधळाची प्रत्यक्ष दृश्यरूपाने मांडणी करून विभागाला जाग येण्यासाठी हे आंदोलन राबवण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा गौरव करून सन्मान पत्रासह शिक्षण विभागाला निवेदने व निष्क्रियतेचे तोरण लावण्यात आले.
या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाप्रमुख चेतन दादा उतेकर, जिल्हा सचिव अमोल पेणकर, तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे, महाड तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख, मनसे शहर उपाध्यक्ष प्रफुल पांडे, उपाध्यक्ष तुषार पवार, उपाध्यक्ष मुस्ताक मुजावर, गणेश कासुर्डे, मनविसे शहर उपाध्यक्ष आदेश गायकवाड, कापडे विभाग अध्यक्ष अभय मोरे, आदित्य गायकवाड,निखिल उतेकर. तसेच इतर विद्यार्थी व पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलन जरी शांततेत पार पडले असले तरी, शिक्षण विभागाने यापुढे दुर्लक्ष केल्यास पुढील तीव्र आंदोलन रायगड जिल्हा परिषद कार्यालयाच्या ठिकाणी छेडण्याचा इशारा चेतन उतेकर यांनी फोनवरून राजिप प्राथमिक शिक्षण विभागाला दिला. यावेळी स्थानिक नागरिकांसह प्रामाणिक काम करणाऱ्या शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा या आंदोलनाला मोठा पाठिंबा असल्याचे पाहायला मिळाले.