राज्यातील राजकारणामध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर पोलादपूरसारख्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गांववजा शहरामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. या दोन्ही पक्षांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांतीनिमित्त ‘होम मिनिस्टर’ या महिलांसाठी खुल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता पैठणीच्या खेळातील अंतिम विजेत्या योगिता विराज दरेकर ठरल्या तर उपविजेत्या कस्तुरी घाटे आणि आरती कासार यांना तिसरा क्रमांक देऊन पैठणीचे बक्षिसही मान्यवर महिलांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
गृहिणी, महिला पोलीस, कवींद्र परमानंद मठगल्ली, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, दशानेमा गुजराती तसेच सैनिकनगर, बाजारपेठेतील महिलांनी या ‘होम मिनिस्टर’ खेळ पैठणीचा करमणूकप्रधान खेळात सहभाग घेतला. यावेळी सर्वात मोठी चंद्रकोर सौ.दुर्वा दर्पण दरेकर, सर्वात लांब मोठे केस सौ.सिध्दी अथर्व बुटाला, सर्वात जास्त बांगडया सौ.मयुरा गांधी, सर्वात मोठे मंगळसूत्र सौ.पूनम कदम यांना वैयक्तीक बक्षिसे प्रदान करण्यात आली. लोकांमध्ये जाऊन तीन वस्तू वेगाने सर्वात प्रथम आणणे यामध्ये सौ.प्रिया सलागरे, सौ.अर्चना पवार आणि सौ.संगिता मोरे यांना वैयक्तीक पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी महाड शहरातील रोहन सकपाळ आणि टीमने ‘होम मिनिस्टर’ खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी मनसेचे दर्पण दरेकर, ओंकार मोहिरे, अजित खेडेकर, मुश्ताक मुजावर, संतोष चिकणे, निलेश सुतार, अमर नगरकर तसेच माजी नगराध्यक्षा अश्विनी गांधी, दुर्वा दरेकर, वैशाली चिकणे, प्राची सुतार, अदिती नगरकर, सारिका पालकर, तसलीम मुजावर, सारिका खेडेकर, पांडे आदी कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.